काठमांडू - १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या कबड्डी गटात भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले. भारतीय पुरुष व महिला संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावत भारताच्या खात्यात दोन सुवर्णपदकांची भर घातली. अंतिम सामन्यात पुरुष संघाने श्रीलंकेचा, तर महिला संघाने यजमान नेपाळचा पराभव केला.
पुरुष गटाच्या अंतिम लढतीत भारताने श्रीलंकेचा ५१-१८ असा पराभव केला. भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासून आघाडी घेतली. भारताच्या चढाई आणि बचावासमोर लंकेचे खेळाडू हतबल ठरले. मध्यंतरापर्यंत भारताकडे २८-११ अशी आघाडी होती. पवन कुमार शेरावत, नवीन कुमार, नितेश कुमार, परवेश आणि विशाल भारद्वाज यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या विजयात हातभार लावला.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने यजमान नेपाळचा एकतर्फी पराभव केला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताकडे फक्त ४ धावांची आघाडी होती. मध्यंतरापर्यंत १४-१० अशी स्थिती असताना भारतीय संघाने हा सामना ५०-१३ असा जिंकला. भारताकडून चढाईत सोनाली शिंगटे, पुष्पा, साक्षी कुमारी यांनी, तर दीपिका जोशेप, प्रियांका, रितू नेगी यांनी दमदार खेळ केला.
हेही वाचा - दक्षिण आशियाई स्पर्धा : सातव्या दिवशी भारताला ३८ पदके
हेही वाचा - दक्षिण आशियाई स्पर्धा : सहाव्या दिवशी कुस्तीमध्ये भारताला ४ सुवर्णपदके