अहमदनगर - आज भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज जहीर खान याचा वाढदिवस आहे. जहीरचा जन्म 7 ऑक्टोबर 1978 साली अहमदनगर जिल्हातील श्रीरामपुर या शहरात अगदी सामान्य कुटुंबात झाल. बरितयार खान आणि जकिया खान यांचा जहीर 2 नंबरचा मुलगा. दिशान जहिर आणि अनिस अशी 3 मुले असणारे खान कुटंबीय श्रीरामपुर शहरातील रेव्हन्यू कॉलनीत आपल्या छोट्याशा घरात राहत असत. जहीरच्या वडिलांचा छायाचित्रणाचा छोटेखानी व्यवसाय होता. घरातच स्टुडीओ आणि आई जकिया खान या शिक्षीका, असे हे जहीरच्या कुटुंबातील वातावरण होते. लहानपणापासून जहीरला क्रिकेट खेळण्याची आवड होती. हातात फळी घेऊन जहीर घराजवळ आपल्या भावंडासह क्रिकेट खेळायचा.
शांत स्वभावाचा खेळाडू अशी जहीरची ओळख -
जहीरने श्रीरामपूर येथील के.जे. सोमैया हायस्कूल येथे इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे रावबहादूर नारायणराव बोरावके महाविदयालयात 11 वी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. मात्र, कॉलेजला असतानाही जहीरचे किकेट प्रेम कमी झाल नव्हते. अभ्यासातही हुशार असल्याने घरातून त्याला फारसा विरोध होत नसायचा. कॉलेजच्या मैदानावरच जहीर मित्रांसमवेत किकेट खेळायचा. शांत स्वभावाचा खेळाडून अशी जहीरची ओळख होती. त्याला त्याच्या सुरुवातीच्या काळात मोठा भाऊ दिशान आणि कॉलेजमधील त्याचे शिक्षक लड्डो शेख यांनी खुप मदत केली.
17 वर्षाची दिमागदार कारकीर्द -
11 वी 12वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जहीरने थेट मुंबई गाठली. त्याला 12वीत 84 टक्के मार्क पडल्यामुळे अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला होता. मात्र जहीरला क्रिकेटपटू व्हायचे होते. याचदरम्यान, त्याची भेट सुधीर नाईक यांच्याशी झाली. जहीरची गोलंदाजी ही नाईक यांना भावली. त्यामुळे त्यांनी जहीरला गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. तसेच त्याला मुंबई नॅशनल क्लब मधून खेळण्याची संधीही दिली. यादरम्यान, अंशुमन गायकवाडही जहीरची गोलंदाजी बघून त्याला बडोदा संघात सहभागी करुन घेतले. त्यानंतर जहीरने बडोद्याकडून पहिला रणजी सामना खेळला आणि 2000 मध्ये त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. 10 नोव्हेंबर 2000 रोजी जहीरने बांग्लादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. 2000 ते 2017पर्यंत मोठ्या जिद्दीने क्रिकेट खेळून त्याने आपली कारकीर्द गाजविली.