पुणे - महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने १२ लाख रुपयांचा धनादेश शिष्यवृत्तीच्या माध्यमात प्रदान करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह हर्षवर्धनचे प्रशिक्षक काका पवार उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने किताब जिंकला. त्याने आपलाच लातूरचा सहकारी शैलेश शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली. दोघेही अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू आणि प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांचे पठ्ठे आहेत. त्यांनी काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात कुस्तीचे धडे गिरवले आहेत.
हर्षवर्धनने अंतिम लढत जिंकल्यानंतर उपविजेता शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन मैदानात फेरी मारली होती. त्याच्या या कृतीने त्याने किताबासह असंख्य कुस्तीपटूंची मने जिंकली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान, या संस्थेने हर्षवर्धन सदगीरला १२ लाख रुपयांचा धनादेश शिष्यवृत्ती म्हणून दिला. हर्षवर्धनला विठ्ठल शेठ मणियार यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
हर्षवर्धनला एका वर्षातील प्रशिक्षण आणि खुराकासाठी म्हणून ही शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात आली आहे. एका वर्षानंतरही आवश्यक ती मदत, विद्या प्रतिष्ठानकडून केली जाणार आहे.
दरम्यान, कुस्ती, खो-खो आणि कबड्डी यासारख्या खेळांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेतून खेळाडूंना ही शिष्यवृत्ती दिली जाते. याआधी ही शिष्यवृत्ती कुस्तीपटू राहुल आवारे, अभिजित कटके यांच्यासह चार कुस्तीपटूंना देण्यात आली आहे.