नवी दिल्ली - भारताची वेटलिफ्टर संजिता चानूविरुद्ध लावण्यात आलेले डोपिंगचे आरोप आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने (आयडब्ल्यूएफ) मागे घेतले आहेत. चानूच्या डोपिंग नमुन्यांमध्ये विसंगती आढळल्याचे कारण देत हा निर्णय घेतला. मात्र या आरोपांमुळे गेले काही वर्ष मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगत चानूने 'आयडब्ल्यूएफ'कडे नुकसानभरपाईची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे.
'चानूचे जे चाचणीचे नमुने घेण्यात आले होते. त्यात विसंगती आढळून आल्या. यामुळे जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) आम्हाला चानूवरील आरोप मागे घेण्यास सांगितले आहे.'अशी माहिती आयडब्ल्यूएफने दिली आहे
आयडब्ल्यूएफचे कायदा सल्लागार लीला सागी यांचे हस्ताक्षर असलेल्या ई-मेलद्वारे चानूला अंतिम निर्णयाची माहिती देण्यात आली. या निर्णयानंतर, उत्तेजक सेवन प्रकरणाच्या आरोपातून अधिकृतरीत्या माझी सुटका झाली आहे, याचा आनंद आहे. मात्र त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेला पात्र ठरण्यासाठी असलेल्या स्पर्धाना मी मुकले. या आरोपांच्या निमित्ताने मला जो मानसिक त्रास झाला आहे त्याची जबाबदारी कोण घेणार? असे चानूने म्हटलं आहे.
ऑलिम्पिक पदक हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. कमीतकमी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे लक्ष्य खेळाडू बाळगतात. ही संधी आयडब्ल्यूएफने माझ्याकडून हिसकावून घेतली. त्यामुळे आयडब्ल्यूएफने याबाबतीत स्पष्टीकरण देऊन नुकसानभरपाई द्यावी, असे चानूने सांगितले. तसेच कोणत्याही निष्कर्षांशिवाय एखाद्या खेळाडूवर काही वर्षांचे निलंबन घालण्यात येते. अशात एखाद्या दिवशी ई-मेल पाठवून संबंधित खेळाडू दोषी नसल्याचे सांगण्यात येते. आयडब्ल्यूएफला खेळाडूच्या कारकीर्दीची चिंता नाही, हेच यामुळे सिद्ध होते, असेही ती म्हणाली.
हेही वाचा - जगज्जेती महिला धावपटू सलवा ईद नासरवर बंदी
हेही वाचा - डोळ्यावर पट्टी बांधून 5 किलोमीटरचे अंतर केले पार!...मिरजेच्या स्केटिंगपटूचा विक्रम