हैदराबाद : काही दिवसांपूर्वी व्यावसायिक टेनिसला अलविदा करणारी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी (५ मार्च) हैदराबादच्या एलबी स्टेडियमवर निरोपाच्या प्रदर्शनीय सामन्यात भाग घेतला. सानियाने एकेरी गटात रोहन बोपन्नाविरुद्धचा हा सामना जिंकला. सामना संपल्यानंतर सानिया भावूक झाली होती. तिच्या 20 वर्षांच्या दीर्घ प्रवासाची आठवण करताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. यावेळी संपूर्ण स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात गुंजत होते. यासह सानियाचा एक खेळाडू म्हणून प्रवास तेथेच संपला जिथून तिने सुरुवात केली होती.
देशासाठी खेळणे मोठा सन्मान : यावेळी सानिया मिर्झा म्हणाली की, 20 वर्षे देशासाठी खेळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की त्याने आपल्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करावे. मी हे करण्यास सक्षम आहे. यानंतर ती अचानक भावूक झाली. ती म्हणाले की, हे आनंदाचे अश्रू आहेत. मी यापेक्षा चांगला निरोप मागू शकले नसतो. सामन्यादरम्यान काही चाहत्यांच्या हातात 'वी मिस यू सानिया' असे फलक होते.
'सानिया भारतीय खेळांसाठी प्रेरणा' : सानियाच्या शेवटच्या सामन्यात भारताचे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सानिया मिर्झाचा निरोपाचा सामना पाहण्यासाठी मी हैदराबादला आलो आहे. या सामन्यासाठी खूप लोक आले आहेत याचा मला आनंद आहे. ते म्हणाले की, सानिया मिर्झा ही केवळ भारतीय टेनिससाठीच नाही तर एकूणच भारतीय खेळांसाठी प्रेरणा आहे. मंत्री रिजिजू यांनी सांगितले की, मी क्रीडा मंत्री असताना सानियाच्या संपर्कात होतो. सानियाचा शेवटचा सामना पाहण्यासाठी टॉलिवूड, बॉलिवूड आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रिटी एलबी स्टेडियमवर आले होते. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, सिक्सर किंग युवराज सिंग आणि सितारामन सिनेमाचा नायक दुल्कर सलमान या कार्यक्रमात आकर्षणाचे केंद्र होते.
अनेक पुरस्काराने सन्मानित : सानियाने तिच्या 20 वर्षांच्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीत 6 ग्रँड स्लॅम, 43 डब्लूटीए विजेतेपद, आशियाई क्रीडा स्पर्धेत 8 पदके आणि राष्ट्रकुल स्पर्धेत 2 पदके जिंकली आहे. हैदराबादची ही क्वीन 91 आठवडे दुहेरी जागतिक क्रमवारीत अव्वल राहिली आहे. भारतीय टेनिसमधील योगदानासाठी सानियाला खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, तसेच अर्जुन, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सानिया सध्या महिला आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मार्गदर्शक आहे.
हेही वाचा : Babar Ajam On ODI World Cup : आम्ही भारतात होणाऱ्या विश्वचषकावर लक्ष केंद्रित केले आहे - बाबर आझम