नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) बुधवारपासून डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज सुरू करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची शक्यता असलेल्या आणि मूळ भारतीय संघात भाग घेऊ शकणार्या खेळाडूंसाठीच ही शूटिंग रेंज पहिल्या टप्प्यात खुली असणार आहे.
"नेमबाजांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि प्राधिकरणाने तयार केलेल्या एसओपीचे काटेकोरपणे पालन केले जाईल. तसेच व्हायरसच्या संसर्गामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू केला जाईल", असे प्राधिकरणाने सांगितले आहे.
शूटिंग रेंजच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नेमबाजांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे. कारण श्रेणीसाठी सिंगल पॉइंट एन्ट्री सिस्टम ठेवली गेली आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंगही केले जाईल. नेमबाजांना त्यांच्या फोनवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे लागेल.
तसेच लेन व शूटिंग स्टेशनच्या वापरामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे, असे सांगण्यात आले आहे. शूटिंग रेंजच्या ठिकाणी काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती देखील दिली जाईल.