नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अनेक लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवले जात आहे. अशात क्रीडा मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाची (साई) केंद्रे, क्वारंटाइनसाठी उपयोगात आणण्याची परवानगी दिली आहे.
साईची विभागीय केंद्रे, स्टेडियम आणि हॉस्टेल्स कोरोना संशयीतांना क्वारंटाइन करण्यासाठी वापरली जाणार आहेत.
क्रीडा मंत्रीचे सचिव राधेश्याम जुलानिया यांनी पीटीआयला बोलताना सांगितलं की, 'आरोग्य मंत्रालयाच्या मागणीनुसार, आम्ही साईची केंद्रे क्वारंटाइनसाठी वापरण्यास देणार आहोत. कोरोना एक प्रकारची महामारी असून यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामुळे आमच्याकडून संपूर्णपणे मदत केली जाईल.'
दरम्यान, आरोग्य मंत्रालय साई केंद्राचा वापर कधी करेल, हे जुलानिया यांनी स्पष्ट केलं नाही. साईचे १० विभागीय केंद्र तर ५ स्टेडियम आहेत. शासकीय अंदाजानुसार, यात २००० हून अधिक लोकांना क्वारंटाइन करता येऊ शकते.
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला असून भारतातही ३४१ जणांना याची बाधा झाली आहे. तर देशात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
हेही वाचा - VIDEO : मोदींच्या 'जनता कर्फ्यू'ला धोनीसह चेन्नईच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवून दिला प्रतिसाद
हेही वाचा - पाकिस्तानी खेळाडूला कोरोनाची भीती; घातले 'श्रीरामा'स साकडे..!