कडपा - आंध्र प्रदेशमधील कडपा जिल्ह्यात एका कबड्डीपटूचा चालू सामन्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेंद्र असे नाव असलेला हा कबड्डीपटू कडपा जिल्ह्यातील गगन्नपल्लीच्या वालुरू मंडळ येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता.
या सामन्यात नरेंद्रने चढाई केली असताना विरुद्ध संघाने त्याला पकडून खाली पाडले. त्यानंतर तो उठला आणि काही पावले चालल्यावर खाली कोसळला. या घटनेनंतर आयोजकांनी तत्काळ नरेंद्रला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - सेहवागने एका शब्दात केले टीम इंडियाच्या साहसाचे कौतुक
नरेंद्र चेन्नरू मंडल येथील कोडापेटाचा रहिवासी होता. कबड्डीची आवड असणाऱ्या नरेंद्रने एम.कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. शासनाच्या गगन्नपल्ली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये नरेंद्र नेहमी सहभाग घेत होता. मात्र, यंदाची स्पर्धा त्याच्या आयुष्याची शेवटची स्पर्धा ठरली.
नरेंद्रच्या निधनामुळे संपूर्ण गावातून शोक व्यक्त केला जात आहे. स्पर्धेतून मी चषक घेऊन परतेन, असे नरेंद्रने आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी नरेंद्रच्या पालकांनी केली आहे.