नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
मोदी काय म्हणाले?
"भारतभरातील नागरिकांकडून मला खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यासाठी अनेक विनंत्या येत आहेत. त्यांच्या मतांसाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करत, खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात येत आहे. जय हिंद! मेजर ध्यानचंद हे भारतातील अग्रगण्य खेळाडूंपैकी होते ज्यांनी भारताचा सन्मान वाढविला. आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्याच्या नावावर ठेवला जाणे योग्य आहे", असे ट्विट मोदी यांनी केले.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाने आम्ही सर्व जण प्रभावित आहोत. विशेषत: हॉकी संघातील आपल्या मुला-मुलींनी जी इच्छाशक्ती दाखवली, जिंकण्याच्या प्रती ती जिद्द दाखवली ती वर्तमान आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. देशाला अभिमानास्पद बनवलेल्या क्षणांमध्ये, अनेक देशवासियांची विनंती देखील समोर आली आहे, की खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद जी यांना समर्पित केले जावे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता त्याचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे, असे मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.