मंडाले - म्यानमारच्या मंडाले येथे सुरू असलेल्या आयबीएसएफ विश्व -६ रेड स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीने उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. पंकजने पाकिस्तानच्या जुल्फिकार कादिरला ५-२ ने हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
हेही वाचा - नेदरलँडच्या फुटबॉलपटूची रस्त्यात गोळी घालून हत्या
याअगोदर पाकिस्तानच्या मोहम्मद अहसान जावेदला पंकजने ५-१ ने हरवले होते. भारताचा लक्ष्मण रावत आणि पुष्पेंदर सिंह या दोन खेळाडूंनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्मणने चीनच्या गाओ यांगला तर पुष्पेंदरने थायलंडच्या क्रिटसनौत लर्टसात्याथोर्नला ५-४ ने पराभूत केले.
![pankaj advani enters in quarter final of ibsf world 6 red snooker championship](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4496686_laxmanrawat_2009newsroom_1568963929_590.jpg)
उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्मणचा सामना हाँगकाँगच्या चेयुंग का वाइशी, पुष्पेंदरचा सामना म्यानमारच्या मिन लिन आणि पंकजचा सामना थायलंडच्या तिरापोंगपैबूनशी होणार आहे. महिलांमध्ये भारताच्या अमी कामनीने आपले आव्हान टिकवून ठेवले आहे. उपांत्य फेरीत तिची गाठ हाँगकाँगच्या एनजी ओन यीशी पडेल.
पंकजने २२ वे विश्व विजेतेपद -
भारताचा आघाडीचा खेळाडू पंकज अडवाणीने आयबीएसएफ विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. म्यानमारच्या मंडाले येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने अंतिम सामन्यात नेय थ्वाय ओलाला ६-२ ने हरवत कारकिर्दीतील २२ वे विश्व विजेतेपद नावावर केले.
बिलियर्ड्सच्या शॉर्ट फॉरमॅट प्रकारात पंकजचे हे सलग चौथे जेतेपद आहे. मागच्या वर्षी अंतिम सामन्यातही पंकजने नेय थ्वाय ओलाला पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले होते. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक स्पर्धेत पंकजने बिलियर्ड्स, स्नुकरमध्ये विजेतेपद पटकावले आहे. २००३ मध्ये पहिले जगज्जेतेपद पटकावल्यानंतर पंकजची विजयी घोडदौड सुरूच आहे. या खेळात सर्वाधिक जगज्जेतेपद पटकावणारा तो जगातील एकमेव स्नूकरपटू ठरला आहे.