चेन्नई - भारतीय संघ फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत ग्रुप बी मध्ये अजेय राहिला. तसेच गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावत भारताने शुक्रवारी उपांत्य फेरीत धडक मारली. लीग स्टेजच्या अंतिम दिवशी भारताने हंगेरी आणि मोल्दोवावर विजय मिळवला. तर स्लोवेनियाविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला.
माजी विश्वचॅम्पियन विश्वनाथन आनंद यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने लीग स्टेजमधील 9 सामन्यातील 7 विजयासह आणि दोन सामन्यात बरोबरी साधत 16 गुणांची कमाई केली. भारतीय संघ ग्रुप बीमध्ये अव्वल राहिला. हंगेरीचा संघ 15 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. भारत आणि हंगेरी हे दोन संग प्ले ऑफ फेरीसाठी पात्र ठरले.
भारताने हंगेरीचा 4-2 ने धुव्वा उडवला. या सामन्यात विश्वनाथन आनंदसह वरिष्ठ महिला खेळाडू कोनेरू हम्पी आणि निहाल सरीन यांनी विजय मिळवला. तर डी हरिका आणि आर. वैशाली यांनी बरोबरी साधली. पी हरिकृषाचा इमरे बलोगकडून पराभव पत्कारावा लागला.
पुढील फेरीत भारताने विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी, डी हरिका यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील भारताने मोल्दोवावर 5-1 ने विजय मिळवला. विदित गुजराती, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी आणि युवा प्रज्ञानानंद यांनी विजय मिळवला. तर बी अधिबान आणि बी सविता यांनी सामना बरोबरीत सोडवला. ग्रुप बी मध्ये अव्वलस्थान पक्के झाल्यानंतर भारताने स्लोवेनियाविरुद्ध 3-3 असा ड्रा खेळला. उपांत्य फेरीतील सामने 13 सप्टेंबर रोजी होणार आहेत.
हेही वाचा - IPL 2021 : भारताच्या सर्व खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, खेळाडू यूएईला रवाना
हेही वाचा - IPL 2021 च्या उर्वरित हंगामाला सुरूवात होण्याआधीच इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची माघार