भुवनेश्वर - ओडिशा आगामी हॉकी पुरूष ज्यूनियर विश्वकप 2021 स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली. यावेळी क्रीडा आणि युवा मंत्री तुषार कांती बेहरा, एफआयएच अध्यक्ष डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा आणि हॉकी इंडियाचे सचिव उपस्थित होते.
हॉकी पुरूष ज्यूनियर विश्वकप स्पर्धा 24 नोव्हेबर ते 5 डिसेंबर याकाळात होणार आहे. या स्पर्धेत भारत, कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इराण, बेल्सिजम, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, स्पेन, अमेरिका, कॅनाडा, चिली आणि अर्जेंटिना हे संघ सहभागी होणार आहेत.
ओडिशा भुवनेश्वर आणि राउरकेला येथे 2023 साली एफआयएच पुरूष हॉकी विश्व कपचे यजमानपद भूषवण्यासाठी तयार आहे. आता मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नोव्हेबरपासून सुरू होणाऱ्या एफआयएच ओडिशा हॉकी पुरूष ज्यूनियर विश्वकप 2021 चे यजमानपदाच्या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. त्यांनी या प्रतिष्ठित स्पर्धेच्या लोगोचे अनावरण देखील केले.
मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले की, ओडिशा देशात हॉकीचे केंद्र आहे आणि ओडिशा राज्य सरकार खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शक्य ते करेल. आम्ही जगातील टॉपच्या 16 संघाचे स्वागत करण्यासाठी तत्पर आहोत.
हेही वाचा - IPL 2021 : श्रेयस अय्यर टी-20 क्रिकेटमध्ये 4 हजारी मनसबदार
हेही वाचा - आयसीसीने T20 विश्वकरंड स्पर्धेसाठी लाँच केलं थीम साँग