नवी दिल्ली - भारतीय रायफल संघटनेने (एनआरएआय) क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी दिग्गज नेमबाज अंजूम मौदगिल हिच्या नावाची शिफारस केली आहे. तर सलग दुसऱ्या वर्षी जसपाल राणा यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
अंजून, जसपाल यांच्याशिवाय एनआरएआयकडून सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, मनू भाकर आणि इलाव्हेनिल व्हॅलारिव्हान यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
अंजूमने २००८ साली नेमबाजी सुरू केली. चंदीगडच्या २६ वर्षीय अंजूमने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे. मागील वर्षी अंजूम आणि दिव्यांश पवार यांनी म्युनिच आणि बीजिंगमध्ये विश्वचषकात मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण जिंकले होते.
मनू भाकर, सौरभ चौधरी आणि अनीश भानवाला या खेळाडूंच्या जडणघडणीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या ४३ वर्षीय जसपाल यांची द्रोणाचार्य पुरस्कारसाठी सलग दुसऱ्या वर्षी शिफारस करण्यात आली आहे. मागील वर्षी जसपाल यांची द्रोणाचार्यसाठी निवड न झाल्यावरून वाद उत्पन्न झाला होता. पण जसपाल यांना यंदा द्रोणाचार्य पुरस्कार मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, खेलरत्न पुरस्कारापोटी पदक, प्रमाणपत्र आणि साडेसात लाख रुपये रोख रक्कम दिली जाते तर द्रोणाचार्य या पुरस्कारादाखल पाच लाखांची रोख मिळते.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटीलचा विश्वविक्रम, पण..
हेही वाचा - भारतीय बॉक्सर अखिल कुमारचे नाडामध्ये पुनरागमन