मुंबई - राज्यात कला, क्रीडा शिक्षकांसाठी एक चांगले नवीन धोरण आणले जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज विधानपरिषदेत केली. शिक्षक आमदार नागो गाणार, श्रीकांत देशपांडे आदींनी राज्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक भरती संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात राज्यमंत्री कडू यांनी राज्यात नवे धोरण आणले जाणार असल्याची घोषणा केली.
हेही वाचा - सौराष्ट्राने जिंकलं रणजीचं पहिलवहिलं विजेतेपद
राज्यातील पवित्र पोर्टलमध्ये कला, क्रीडा आणि कार्यानुभव ही पदेच दाखविण्यात आली नाहीत. या पदांचा समावेश केला जाईल का? असा सवाल शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केला. तर, या प्रश्नावर लवकरच बैठक घ्यावी, अशी मागणी श्रीकांत देशपांडे यांनी केली. जर कोरोनाचा प्रभाव दिसला नाही तर यासाठी बैठक घेतली जाईल, असे राज्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी राज्यात आरटीई कायदा असतानाही ही कला, क्रीडा शिक्षकांचे पदे संपविण्यात आली. त्यासाठी दोन जीआर काढून ही पदे संपविण्यात आली होती, असा आरोप करत हे जीआर रद्द करावेत, अशी मागणी केली. त्यावर राज्यमंत्र्यांनी दोन्ही शासन निर्णयाची माहिती घेतली जाईल. कायद्याच्या तरतुदीनुसार ते जीआर नसतील तर ते तातडीन रद्द केले जातील असे आश्वासनही यावेळी कडू यांनी दिले.