बंगळुरू - आर्मी जवान ते भारतीय अॅथलेटिक्स महासंघात प्रशिक्षक बनलेले काशिनाथ नाइक यांनी आज मंगळवारी एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमरिवाला यांच्या या वक्तव्याचे खंडन केलं की, त्यांनी ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राला प्रशिक्षण दिलं नाही.
नाईक यांनी स्पष्ट केलं की, मी माझ्या शब्दावर कायम आहे. मी 2015 ते 2017 या दरम्यान, नीरज चोप्राला प्रशिक्षण दिलं. मी नीरज चोप्रासोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून पोलंडला गेलो होते. गॅरी कॅल्वर्ट मुख्य प्रशिक्षक होते.
नाईक पुढे म्हणाले की, आदिल सुमरिवाला यांचे वक्तव्य ऐकून मी खूप दु:खी झालो आहे. त्यांना माझ्याविषयी काही माहिती नाही. मी भालाफेकच्या भारतीय इतिहासात 2010 मध्ये दिल्लीमध्ये आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेत कास्य पदक जिंकणारा पहिला खेळाडू आहे.
2010 साली ढाकामध्ये आयोजित दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याचे देखील नाईक म्हणाले. मी 2011 विश्व सैन्य क्रीडा स्पर्धेत चौथ्या स्थान पटकावले होते. मला प्रसिद्धी नको. मी याबाबत नीरज चोप्राला देखील बोललो आहे, असे देखील नाईक यांनी सांगितलं.
भारत ऑलिम्पिकमध्ये कुस्ती, बॉक्सिंग आणि इतर खेळात सुवर्ण पदक जिंकत आहे. पण अॅथलेटिक्समध्ये आपल्याला 2021 टोकियो ऑलिम्पिकपर्यंत वाट पाहावी लागली. भारतीय प्रशिक्षकांना कमी लेखलं जातं, असा आरोप नाईक यांनी केला.
काशिनाथ नाईक यांनी एक दिवसाआधी आयएएनएसशी बोलताना म्हटलं होतं की, नीराज चोप्राने आभार व्यक्त करण्यासाठी मला फोन केला होता.
हेही वाचा - नीरज चोप्राचा सन्मान; देशात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येणार
हेही वाचा - हे सुवर्ण पदक माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण देशाचं - नीरज चोप्रा