नवी दिल्ली - ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने तिसऱ्या इंडियन ग्रां. प्री. स्पर्धेत (आयजीपी) ८८.०७ मीटर भाला फेकत स्वत: च्या विक्रमाला मोडित काढले.
ही नीरजची आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. कोरोनामुळे एका वर्षाहून अधिक काळानंतर प्रथमच स्पर्धेत भाग घेणाऱ्या चोप्राने पाचव्या प्रयत्नात हा विक्रम नोंदवला. २०१८च्या आशियाई स्पर्धेत त्याने ८८.०६ मीटर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम केला होता.
२४ वर्षीय चोप्राने दोन फाऊल केले. त्यानंतर ८३.०३ मीटर भाला फेकत सुरुवात केली. चौथ्या थ्रोमध्ये त्याने ८३.३६ मीटर अंतरावर भाला फेकला. त्यानंतर पाचव्या थ्रोमध्ये त्याने आपलाच विक्रम मोडला. शेवटचा थ्रो ८२.२४मीटर होता. उत्तर प्रदेशच्या शिवपाल सिंह याने ८१.६३ मीटरसह रौप्यपदक पटकावले. हरयाणाचा साहिल सिलवाल ८०.६५ मीटर कामगिरीसह तिसरा आला.
चोप्रा म्हणाला, "मी तयार होतो आणि आज वारासुद्धा होता. मी माझ्या आवडत्या भाल्याचा वापर केला. कोरोनाचा प्रशिक्षण आणि तत्परतेवर परिणाम झाला परंतु आम्ही त्यास सामोरे गेलो.''
हेही वाचा - अर्धशतक हुकलं, पण नाव झालं...! मोदी स्टेडियमवर हिटमॅनची 'कडक' कामगिरी