नवी दिल्ली - कोरोनाच्या उद्रेकामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची जुनी परंपरा यंदा मोडीत निघाली. दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती भवनात खेळाडूंचा गौरव केला जातो, पण यंदा हा सोहळा ऑनलाइन पार पडला.
सर्वप्रथम, या सोहळ्याची सुरुवात राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने झाली. पुण्याहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडली गेलेली टेबल टेनिसपटू मनिका बत्राला हा सन्मान देण्यात आला. यानंतर बंगळुरूहून भारतीय महिला हॉकीची कर्णधार राणी रामपालला खेलरत्न देऊन गौरवण्यात आले. यानंतर, पॅराअॅथलिट मारियाप्पन थांगावेलूला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्मा आणि विनेश फोगाट या सोहळ्याला अनुपस्थित होते.
त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडू आणि प्रशिक्षक मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, सोनीपत, चंदीगड, लखनऊ, दिल्ली, भोपाळ आणि इटानगर येथून या सोहळ्याशी जोडले गेले.आजच्या दिवशी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आल्याची घोषणाही केली. या वर्षापासून अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना अनुक्रमे १५ आणि २५ लाखांचे मानधन दिले जाणार असल्याचे रिजीजू यांनी जाहीर केले.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी उपस्थितांची अंतिम यादी -
- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार - मनिका बत्रा, राणी रामपाल, मारियाप्पन थांगावेलू.
- अर्जुन पुरस्कार - अतनू दास, दीपक हुडा, आकाशदीप सिंग, लव्हलिना बोरगोहिन, मनु भाकर, मनीष कौशिक, संध्या झिंगन, दत्तू भोकनळ, राहुल आवारे, द्युती चंद, दीप्ती शर्मा, शिवा केशवन, मधुरिका पाटकर, मनीषा पाटील, मनीष, चिराग शेट्टी, विशाल भार्गवंशी, अजय सावंत, सारिका काळे, दिव्या काकरान.
- द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव श्रेणी) - धर्मेंद्र तिवारी, पुरुषोत्तम राय, शिव सिंग, रोमेश पठाणिया, केके हुड्डा, विजय मुनीश्वर.
- द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) - जसपाल राणा, कुलदीप हांडू, जुड फेलिक्स.
- ध्यानचंद पुरस्कार - कुलदीपसिंग भुल्लर, जिन्सी फिलिप जे. रणजित कुमार, तृप्ती मुरगंडे, प्रदीप श्रीकृष्ण गंधे, सत्यप्रकाश तिवारी, मनजितसिंग, एन. उषा, मनप्रीतसिंग, नेत्रपाल हुडा, नंदन पी. बाल, दिवंगत सचिन नाग (अशोक नाग-मुलगा).
- तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार - सरफराज सिंग, टाक तमुट, मगन बीसा (सुषमा बीसा - पत्नी), अनिता देवी, केवल हिरेन कक्का, सतेंद्र सिंह.