नवी दिल्ली - स्टार धावपटू उसेन बोल्टने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. त्यापैकी ९.५८ सेकंदामध्ये १०० मीटरचा बोल्टचा विक्रम खास मानला जातो. सध्या भारताच्या एका उसेन बोल्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि या धावपटूची दखल मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी घेतली आहे.
या धावपटूचे नाव आहे रामेश्वर गुर्जर. मध्यप्रदेशच्या रामेश्वरचा वेगात धावण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे प्रसिद्धी मिळाल्यानंतर, रामेश्वरने एक मुलाखत दिली. 'मला जर योग्य प्रशिक्षण मिळाले तर मी उसेन बोल्टचा विक्रम मोडू शकतो', असे त्याने मुलाखतीत म्हटले आहे.
या व्हिडिओला, शिवराज सिंह चौहान आणि किरण रिजिजू यांनी ट्विटरद्वारे शेअर केले आहे. चौहान यांनी आपल्या ट्विटमध्ये 'भारतात गुणवान व्यक्तींची कमी नाही. त्यांना योग्य स्थान आणि संधी मिळाली तर ते इतिहास घडवू शकतात. '
क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी चौहान यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. 'शिवराज सिंह चौहानजी कोणाला तरी या खेळाडूला माझ्यापर्यंत घेऊन येण्यास सांगा. मी त्याला अकादमीत टाकण्याची व्यवस्था करतो.' रामेश्वर मागच्या सहा महिन्यांपासून १०० मीटर धावण्याचा सराव करत आहे. उंची कमी असल्याने त्यांची सैन्यात निवड झाली नाही. रामेश्वरने ११ सेकंदामध्ये १०० मीटर धावण्याचा पराक्रम केला आहे.