मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प मांडला. महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. कृषी, शिक्षण, बेरोजगार, महिला सुरक्षेसाठी भरीव निधींची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्रीडा विभागासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
हेही वाचा - विंडीजच्या डॅरेन सॅमीकडे पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद
पुण्याच्या बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केली आहे. तसेच, कबड्डी, कुस्ती आणि खो-खो या स्पर्धांच्या आयोजनासाठी ७५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय, व्हॉलिबॉल स्पर्धांच्या आयोजनासाठी देखील ७५ लाखांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. पुण्यात ऑलिम्पिक भवन बनवण्याचेही त्यांनी अर्थसंकल्पात म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलासाठी आधी ८ कोटींचा निधी देण्यात येत होता. आता ही निधी २५ कोटी इतका वाढवण्यात आला आहे.
क्रीडाक्षेत्रात विविध तरतुदी केल्यानंतर, अजित पवार यांनी नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्यात आल्याचेही म्हटले आहे. या निर्णयानुसार आता नाट्यसंमेलनासाठी १० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पुणे जागतिक चित्रपट महोत्सवासाठी ४ कोटी आणि सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.