सिल्व्हरस्टोन - शनिवारी झालेल्या ब्रिटीश ग्रँड प्रिक्स-2020 च्या पात्रता शर्यतीत मर्सिडीज संघाचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने पोल पोजिशन मिळवली. त्याचा साथीदार वाल्टेरी बोटास दुसर्या स्थानावर राहिला. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने तिसरे स्थान पटकावले, तर फेरारीचा चार्ल्स लेकलेर्क चौथ्या आणि लॅन्डो नॉरिस पाचव्या स्थानावर राहिले.
या शर्यतीमध्ये हॅमिल्टनने 1 मिनिट 24.303 सेकंदाची वेळ नोंदवली. सिल्व्हरस्टोन सर्किटवर त्याने आत्तापर्यंत विक्रमी सातवेळा विजय मिळवला आहे. घरगुती इव्हेंटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला ड्रायव्हर ठरला आहे.
चार वेळचा चॅम्पियन सेबस्टियन वेटलला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर रेसिंग पॉईंटच्या निको हल्केनबर्गला नववे स्थान मिळाले.
तत्पूर्वी, रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने येथे ब्रिटीश ग्रँड प्रिक्स-2020 च्या पहिल्या सराव शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला होता. तर रेसिंग पॉईंटचा निको हल्केनबर्ग नवव्या स्थानावर राहिला. सर्जिओ पेरेझची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर निको हल्केनबर्गने त्याची जागा घेतली आहे.
कोरोनाची लागण झालेला पेरेझ हा पहिला फॉर्म्युला वन ड्रायव्हर आहे. काही दिवसांपूर्वी, ब्राझील, कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेतील फॉर्म्युला वन शर्यती कोरोनाच्या उद्रेकामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी कॅलेंडरमध्ये तीन नवीन शर्यती जोडल्या गेल्या आहेत.