नवी दिल्ली - 'मी मेरी कोम आणि निकहत झरीन यांच्यातील वादप्रकरणी भारतीय महासंघाला देश आणि खेळाडूंच्या हितार्थ निर्णय घेण्यास सांगणार आहे,' अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली. मात्र, याप्रकरणी मध्यस्थी मला जमणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी टोकियो ऑलिम्पिकपूर्वी भारतीय संघाची निवड करण्यापूर्वी मेरी कोमविरुद्ध आपली निवड चाचणी घ्यावी, अशी मागणी जागतिक कनिष्ठ गटातील माजी विजेती निकहत झरीनने गुरुवारी पत्राद्वारे रिजिजू यांच्याकडे केली होती. यावर रिजिजू यांनी आपली भूमिका मांडली.
महासंघाने मेरीला नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर थेट ऑलिम्पिक पात्रता मिळवून देण्याचे ठरवले आहे. महासंघाच्या या निर्णयावर निकहतने नाराजी प्रकट केली. फेब्रुवारी २०२० मध्ये चीन येथे ऑलिम्पिक पात्रता फेरी रंगणार आहे. यामध्ये निकहतने ५१ किलो वजनी गटात मेरीविरुद्ध लढण्याची मागणी केली आहे. यावर रिजिजू यांनी निकहतला विनाकारण वाद ओढवून न घेण्याचे सुचवले आहे.
मी महासंघाशी बोलून त्यांना योग्य तो निर्णय घेण्याचे सांगणार आहे. झरीन आणि मेरी कोम यामध्ये निवड करताना कोणत्याही खेळाडूसाठी भावनिकरीत्या विचार न करता देशभावनेला प्राधान्य द्यावे. त्याशिवाय क्रीडामंत्री या नात्याने मी महासंघाच्या कारभारात अधिक हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे रिजिजू म्हणाले. दरम्यान, निकहतनेही रिजिजू यांचे आभार मानून लवकरच महासंघ आपल्या बाजूने निर्णय देईल, अशी आशा व्यक्त केली.