बंगळुरू - कर्नाटकचा श्रीनिवास गौडाने, रेड्यांना घेऊन पाण्यातून धावणाऱ्या स्पर्धेत, १४२.५ मीटरचे अंतर १३.६२ सेकंदात पार केले. श्रीनिवास या कामगिरीसह कर्नाटकच्या पारंपरिक क्रीडा स्पर्धेतील सर्वात जलद धावपटू ठरला. त्याने या स्पर्धेचा ३० वर्षांचा जुना विक्रम मोडित काढला. दरम्यान आता श्रीनिवासची तुलना जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टशी केली जात आहे.
श्रीनिवास हा दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील मुदाबिदरी गावचा रहिवाशी आहे. कंबालामध्ये (चिखलगुट्टा पद्धतीच्या पारंपरिक बैलगाडी शर्यत) विक्रम नोंदवल्यानंतर तो चर्चेत आला आहे. श्रीनिवासने रेड्यांना घेऊन पाण्यातून धावणाऱ्या स्पर्धेत १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले. याचा अर्थ गौडाने १०० मीटर अंतर फक्त ९.५५ सेकंदात पार केले.
जगात सर्वात जलद धावण्याचा विक्रम जमैकाच्या उसेन बोल्टच्या नावे आहे. त्याने १०० मीटरचे अंतर ९.५८ सेकंदात पूर्ण केले होते. श्रीनिवास आणि बोल्टची तुलना केल्यास ०.०३ ने श्रीनिवास पुढे आहे. मात्र, दोघांच्या विक्रमाची तुलना केली जाऊ शकत नाही. कारण श्रीनिवास रेड्यांसोबत चिखलात पळाला होता.
काय आहे कंबाला स्पर्धा -
कर्नाटकामध्ये दरवर्षी कंबाला या चिखलगुट्टा पद्धतीच्या पारंपरिक रेड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जाते. बंगळुरू आणि उडूपी या जिल्ह्यात ही स्पर्धा खूपच लोकप्रिय आहे. या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दोन रेड्यासोबत एक धावपटू या स्पर्धेत सहभाग दर्शवतो.
श्रीनिवासबद्दल -
श्रीनिवास २८ वर्षांचा असून त्यानं शिक्षण सोडून दिलं आहे. सध्या तो शर्यतींची तयारी करतो. तर इतर दिवशी बांधकाम साईटवर काम करतो. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्याला कंबाला शर्यतींचा छंद लागला आहे. या शर्यतीतून श्रीनिवास १ ते २ लाख रुपयांची कमाई रोख बक्षिसाच्या रुपाने करतो.
उसेन बोल्टचा विक्रम -
जमैकाचा उसेन बोल्टने बर्लिनमध्ये झालेल्या २००९ च्या जागतिक अॅथलेटिक स्पर्धेत १०० मीटरचे अंतर ९.५८ सेकंदांत पूर्ण केले होते.
दरम्यान एका पत्रकाराने श्रीनिवास याच्या विक्रमाची पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तो चर्चेत आला असून त्याला ऑलिम्पिकमध्ये पाठवण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.