टोकियो - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जपानमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली आहे. टोकियो ऑलिम्पिक पुढच्या वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान खेळवले जाणार आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिंपिक स्पर्धा सुलभ करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती टोकियोच्या राज्यपाल कोइके यूरिको यांनी गुरुवारी दिली.
या स्पर्धांचे यशस्वी आयोजन होण्यासाठी टोकियो आणि जपानमधील नागरिकांनी समंजसपणा दर्शवला पाहिजे. नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी सुलभ केल्या पाहिजेत यावर विचार सुरू आहे. सरकारने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी या अगोदरच बैठका घेतल्या असल्याचेही त्या म्हणाल्या.
ऑलिम्पिक आणि पॅरालिंपिक स्पर्धा आयोजित करताना अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक खेळाडूची आणि प्रेक्षकाची कोरोना चाचणी, शरीराचे तापमान तपासणी केली जाणार आहे. यासाठी शेकडो तपासणी काऊंटर लावण्यात येणार आहे, अशी माहिती एका जपानी वृत्तपत्राने दिली आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी ऑलिम्पिक व पॅरालिंपिक या दोन्ही स्पर्धांचे उद्घाटन आणि समारोप समारंभही रद्द करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, स्पर्धांचा कालावधी आणि क्रीडाप्रकारांची संख्या याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. सर्व क्रीडा प्रकार खेळवले जातील असे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.