नवी दिल्ली - भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून मंत्रालयांतर्गत क्रीडा संघटनांना आर्थिक सहाय्य करण्याची विनंती केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. मात्र, क्रीडाशी संबंधित कोणताही उल्लेख न केल्याने बत्रा यांनी ही मदत मागितली आहे.
आयओए, नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन (एनएसएफ) आणि राज्य ऑलिम्पिक असोसिएशन (सीओए) यासारख्या क्रीडा संघटनांना अर्थसहाय्य पुरवावे, असे बत्रा यांनी पत्रात म्हटले आहे. वर्षभर क्रीडा स्पर्धाकडे प्रायोजक पाठ फिरवतील, त्यामुळे ही मदत देण्याची मागणी बत्रा यांनी पत्रात केली आहे.
बत्रा म्हणाले, आयओएसाठी 10 कोटीचे अनुदान द्यावे. ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीय महासंघांसाठी प्रत्येकी पाच कोटी, ऑलिम्पिक वगळता अन्य खेळांतील क्रीडा संघटनांसाठी अडीच कोटी आणि राज्य ऑलिम्पिक संघटनांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये अनुदानाची मागणी आहे. कोरोनामुळे या सर्व क्रीडा संघटनांना मोठी आर्थिक अडचण आहे. जर क्रीडा स्पर्धाच्या सरावाला सुरुवात करायची असेल तर या आर्थिक मदतीची गरज आहे. ऑलिम्पिक 2021 नंतर प्रायोजक लाभणार नाहीत, त्यामुळे आम्ही सरकारकडे मदत मागितली आहे.