नवी दिल्ली - भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित झालेली एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाट आनंदी आहे. या शिफारशीमुळे जबाबदारी वाढली असल्याचे विनेशने सांगितले. यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या पाच भारतीय खेळाडूंमध्ये विनेशचा समावेश आहे.
विनेशने एका वृत्तसंस्थेला सांगितले, "सर्वात गौरवशाली क्षण. प्रतीक्षा लांबली होती, परंतु आनंदही दुप्पट झाला. जर देवाची इच्छा असेल, तर मी पुरस्कार स्वीकारेन. आता जबाबदारीही वाढली आहे." आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवणारी विनेश ही एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे. विनेशने २०१९ च्या जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
२०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल खेळ आणि जकार्ता आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. २०१९ मध्ये ती लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.
विनेशशिवाय भारतीय सलामीवीर रोहित शर्मा, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थांगावेलू यांच्या नावांचीही शिफारस केली गेली आहे. दिल्लीत मंगळवारी राष्ट्रीय पुरस्कार समितीची बैठक झाली, ज्यात या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी पाच खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यात आली.