गुलमर्ग (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील बारामुल्ला जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्ग येथे यावर्षी पुन्हा एकदा युवा हिवाळी खेळांचे आयोजन करण्यात आले. महिनाभरापूर्वीच गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. आता गुलमर्गमध्ये लष्कराने हिवाळी स्नो गेम्सचे आयोजन केले गेले. यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या खेळांमध्ये काश्मीरमधील विविध जिल्ह्यातील मुलेही सहभागी झाली होती.
दोनशे जणांनी सहभाग घेतला : यावेळी जम्मू - काश्मीर पोलिसांनी मुलांसाठी स्कीइंग कोर्सचे उद्घाटनही केले. मीडियाशी बोलताना लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या हिवाळी स्नो गेम्समध्ये किमान दोनशे लोकांनी भाग घेतला. काश्मीरमधील विविध जिल्ह्यांतील मुलांनी बर्फाचे वेगवेगळे खेळ खेळले. या मुलांमध्ये कलागुणांची कमतरता नाही व या कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक मुलांनी सहभागी व्हावे, हाच आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. या तरुणांमध्ये मोठा उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले. गुलमर्गमध्ये हिवाळ्यात खूप बर्फवृष्टी होते. म्हणूनच हिवाळी खेळांसारखे कार्यक्रम खोऱ्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
खेळाने मुलांना व्यासपीठ दिले : खेळांमध्ये सहभागी झालेल्या युवा खेळाडूंनी लष्कराचे आभार मानत असे कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्हाला खूप आनंद होत आहे की सैन्याने आम्हाला असे व्यासपीठ दिले आहे. येथे आम्ही आमचे कौशल्य दाखवू शकतो. गुलमर्ग हे एक सुंदर ठिकाण असून स्नो गेम्समध्ये सहभागी होणे हे त्यांच्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. गुलमर्गमध्ये अधिक हिवाळी स्नो गेम्स व्हायला हवेत जेणेकरुन आपण आपली प्रतिभा दाखवू शकू, असे युवा खेळाडू शेवटी म्हणाले.
या आधी खेलो इंडिया हिवाळी खेळांचे आयोजन : 10 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये पाच दिवसीय खेलो इंडिया हिवाळी खेळांचे आयोजन केले गेले. या हिवाळी खेळांमध्ये देशभरातून 11 खेळांमध्ये 1500 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. खेलो इंडिया हिवाळी खेळांची ही तिसरी आवृत्ती होती. 2020 मध्ये सर्वप्रथम या खेळांचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धेत आत्तापर्यंत जम्मू आणि काश्मीरचेच वर्चस्व राहिले आहे. या वर्षीच्या स्पर्धेत स्नो शू रेस, स्कीइंग, आइस स्केटिंग, आइस हॉकी, स्नो बोर्डिंग इत्यादी खेळांचा समावेश होता.