ब्राझील - भारतीय नेमबाजपटूंनी ब्राझील येथे सुरू असलेल्या शुटिंग वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्णपदक तर, सौरभ चौधरीने कांस्यपदक पटकावून इतिहास रचला.
![indian abhishek verma wins gold in issf world cup in brazil](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4286503-thumbnail-3x2-gold_3008newsroom_1567147423_249.jpg)
पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत अभिषेकने २४४.२ गुण कमावले. तर, सौरभला २२१.९ गुण मिळाले. अभिषेक आणि सौरभ यांनी पात्रता इवेंटमध्येच ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. या फेरीत सौरभ ५८४ गुणांसह चौथ्या तर, अभिषेक ५८२ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला होता.
भारताने गाठले पहिले स्थान -
अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर भारत या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारताकडे सध्या दोन सुवर्ण, एक रौप्य तर एक कांस्यपदक आहे. याआधी भारताकडून ईलावेनिल वालारिवनने सुवर्ण आणि संजीव राजपूत यांनी रौप्य पदक पटकावले आहे.