मुंबई - भारताची युवा धावपटू हिमा दास लवकरच खाकी वर्दीत पाहायला मिळणार आहे. आसामच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हिमा दास हिला पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
आसाम सरकारने, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील क्लास-१ आणि क्लास-२ अधिकाऱ्यांच्या पदासाठी क्रीडापटूंना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यात हिमा दासला पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
किरण रिजिजू यांचे ट्विट...
आसाम सरकारने हिमा दासची नियुक्ती पोलीस उपअधीक्षकपदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी, आसाम सरकारच्या निर्णयाचे कौतूक केले आहे.
हिमा दास आसामच्या नगाव जिल्ह्यातील ढिंग गावाची रहिवाशी असून तिचे वडील शेतकरी आहेत. हिमाने २०१८ मध्ये फिनलँड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी हिमा भारताची पहिलीच धावपटू आहे. याशिवाय तिने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटरमध्ये रौप्य, चार वेळा ४०० मीटरमध्ये रिले आणि चार वेळा ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा - क्रीडा अर्थसंकल्प : एका डोळ्यात ‘हसू’ दुसऱ्यात ‘आसू’
हेही वाचा - EXCLUSIVE : जम्मू-काश्मीरचा रेसलर बादशाह खान डब्लूडब्लूई रिंगमध्ये उतरणार