नवी दिल्ली - भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने केर्न्स चषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. तिने अंतिम फेरीत भारताच्याच द्रोणावल्ली हरिकाशी बरोबरी साधली आणि स्पर्धेत सर्वाधिक ६ गुणांची कमाई करत विजेतेपदाला गवसणी घातली. केर्न्स चषक स्पर्धेचे हे दुसरे हंगाम असून हम्पी पहिल्यादांच या स्पर्धेत उतरली होती. या विजयासह हम्पीने खेळाडूंच्या जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले.
हम्पीने स्पर्धेच्या सातव्या फेरीत झालेल्या लढतीत अमेरिकेच्या इरिना क्रश विरूध्द ५२ चालींअखेर बरोबरी साधली होती. यानंतर तिने आठव्या फेरीत रशियाच्या वॅलेंटिना गुनिनाचा ३५ चालींसह पराभव करत विजेतेपदाचा दावा मजबूत केला. तिचे ५.५ गुण झाले होते. विजेतेपदाच्या शर्यतीत हम्पीसमोर रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियूकचे आव्हान होते. पण अंतिम फेरीत हम्पीने हरिकाशी बरोबरी साधली आणि स्पर्धेत सर्वाधिक ६ गुणांसह जेतेपद पटकावले.
विश्वविजेती वेंजून जू हिने ५.५ गुणासंह स्पर्धेत दुसरे क्रमांक पटकावले. ५ गुणांसह अलेक्झांड्रा कोस्टेनियूक तिसऱ्या स्थानावर राहिली. भारताच्या हारिका द्रोणावल्लीला ५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने ४.५ गुणांची कमाई केली.
दरम्यान हम्पी या स्पर्धेआधी जागतिक बुद्धीबळ खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होती. स्पर्धेच्या विजेतेपदासह तिने क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.