नवी दिल्ली - 2018च्या जकार्ता आशियाई खेळात भारताच्या मिश्र रिले संघाने रौप्यपदक जिंकले होते. मात्र या पदकाचे रुपांतर सुवर्णपदकात झाले आहे. या संघाची खेळाडू असलेल्या धावपटू हिमा दासने हे पदक कोरोना योद्ध्यांना समर्पित केले आहे.
या स्पर्धेत पहिले स्थान बहारिनने मिळवले होते. मात्र, बहारिनच्या केमी आडेकोया या धावपटूला डोपिंगमुळे चार वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील भारताला सुवर्णपदक देण्यात आले आहे.
अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) गुरुवारी निवेदन पाठवून याविषयी माहिती दिली. मोहम्मद अनास, एमआर पूवम्मा, हिमा दास, आरोकीया राजीव यांच्या भारतीय संघाने या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
या निर्णयानंतर हिमा म्हणाली, ''हे पदक मी कोरोना काळात नि: स्वार्थपणे आमची सेवा करणारे पोलिस, डॉक्टर आणि उर्वरित कोरोना योद्ध्यांना समर्पित करते.''
अमेरिका, ब्राझील आणि भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तिथे 42 लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ब्राझीलमध्ये 23 लाखांचा आकडा कोरोनाग्रस्तांनी पार केला आहे. यापाठोपाठ भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्येही झपाट्यानं वाढ होत आहे. 13 लाख 36 हजार 861 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 31 हजार 358 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे.