नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकच्या समाप्तीनंतर खेलो इंडिया 2021 स्पर्धा हरियाणाच्या पंचकुला येथे होतील. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी ही घोषणा केली. टोकियो स्पर्धेनंतर खेलो इंडियाच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे रिजिजू यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि राज्याचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले.
या वर्षाच्या अखेरीस खेलो इंडियाचा चौथा हंगाम घेण्याचा सरकारचा विचार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे ते शक्य झाले नाही, असेही ते म्हणाले.
रिजिजू पुढे म्हणाले, "ऑलिम्पिकनंतर मी मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्याशी चर्चा करून खेळांची तारीख निश्चित करेन. टोकियो ऑलिम्पिक संपताच ही तयारी सुरू होईल. तसेच मूलभूत पायाभूत सुविधांवर काम आत्ताच सुरू होऊ शकेल."
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल, अशी आशा आहे. जेणेकरून करोनाच्या संकटानंतर लोकांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल, असे रिजिजू यांनी सांगितले होते.