नागपूर - पोलंडच्या किल्समध्ये पार पडलेल्या युवा विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताकडून नागपूरची महिला बॉक्सर अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून देशाचे आणि नागपूर नगरीचे नाव उंचावले आहे. आज दिल्ली येथून रेल्वेने तिचे नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन झाले. या आगमन प्रसंगी नागपूर नगरीचे प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी, मनपा क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने यांनी अल्फिया पठाण हिचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
कोरोनामुळे अल्फियाचे स्वागत ढोल-ताशाचा गजरात न होता छोटेखाणी, कोरोनाचा नियमांचे पालन करून स्वागत करण्यात आले. यावेळी अल्फिया भावुक झाली. अल्फियाने आपल्या यशाचे श्रेय वडील, आई, भाऊ आणि प्रशिक्षक गणेश पुरोहित यांना दिले. ती वर्ष २०२४ ला होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी करणार आहे. खेळाडूसोबत झालेली उपांत्य फेरी फारच कठीण होती. मात्र, उत्तम सराव आणि जिद्दीच्या भरवशावर ही फेरी पार केली असल्याचे अल्फियाने सांगितलं.
अल्फियाचे प्रशिक्षक गणेश पुरोहित यांनी सांगितले की, सगळे सामने फार आव्हानात्मक होते. अल्फियाने कठीण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे सामने जिंकले.
नागपुरातून बॉक्सिंगची प्रॅक्टिस करणारी अल्फिया पठाण यांनी सुवर्ण पदक जिंकून संपूर्ण जगात नागपूरचा नावलौकिक वाढविला आहे. आता ती ऑलम्पिकमध्ये पदक पटकावेल, अशी आशा नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली. यावेळी अल्फियाचे बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित आणि अल्फिया पठाणचे वडील अक्रम खान पठाण यांचेसुध्दा स्वागत व अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी मनपा क्रीडा विभागाचे नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोनाच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू IPL सोडण्याच्या विचारात - सूत्र
हेही वाचा - IPL २०२१ : पॅट कमिन्सचं कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं योगदान; पीएम केयरला दिली मोठी मदत