नवी दिल्ली : घानाचा फुटबॉलपटू आणि न्यूकॅसल युनायटेड क्लबचा माजी मिडफिल्डर ख्रिश्चन अत्सू याचा तुर्कीच्या भूकंपात मृत्यू झाला आहे. अत्सूचा मृतदेह तुर्कीमध्ये तो राहत असलेल्या निवासस्थानाच्या ढिगाऱ्याखाली सापडला आहे. स्थानिक माध्यमांनी शनिवारी त्याच्या व्यवस्थापकाच्या हवाल्याने ही माहिती दिली. मृत्यूच्या वेळी तो 31 वर्षांचा होता.
आधी जिवंत असल्याच्या बातम्या : तुर्कीमधील त्याचे व्यवस्थापक मुरत उझुनमेहमेट यांनी शनिवारी सांगितले की, तुर्कीच्या दक्षिणेकडील हाते प्रांतात ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडला आहे. ते म्हणाले, अत्सूचा निर्जीव मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडला आहे. सध्या आणखी काही वस्तू बाहेर काढल्या जात आहेत. त्याचा फोनही सापडला आहे. घानाच्या या फुटबॉलपटूचे एजंट नाना सेचेरे यांनी ट्विट केले की, मी मनापासून सर्व हितचिंतकांना जाहीर करू इच्छितो की आज सकाळी ख्रिश्चन अत्सूचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबियांच्या आणि प्रियजनांच्या प्रति माझ्या मनापासून संवेदना आहेत. या आधी त्याचा क्लब हातेस्पोरने सांगितले होते की, अत्सूला जखमी अवस्थेत ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र त्यानंतर त्यांनी आपले विधान बदलले.
मृतदेह घानाला पाठवला : ख्रिश्चन अत्सू सप्टेंबरपासून तुर्की सुपर लिग क्लब 'हातेस्पोर' साठी खेळत होता. तुर्कीचा हाते हाच प्रांत भूकंपाच्या केंद्रस्थानी होता. अत्सू भूकंपाच्या काही तास आधी दक्षिण तुर्कीमधून उड्डाण करणार होता, परंतु त्याने 5 फेब्रुवारीच्या सुपर लीग सामन्यात गेम-विजेता गोल केल्यानंतर क्लबसोबत राहण्याचा निर्णय घेतला. अत्सूचा मृतदेह घानाला पाठवला जात आहे, असे हातेस्पोर क्लबने म्हटले आहे.
तुर्कीत भूकंपाने हाहाकार : 6 फेब्रुवारीला सीरिया आणि तुर्कीत आलेल्या भूकंपाने भयंकर हाहाकार माजवला आहे. येथे अजूनही मोठ्या प्रमाणावर लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक बचाव पथके अद्याप लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. भूकंपात तुर्कीतील हजारो इमारती नेस्तनाबूत झाल्या आहेत. बचाव पथके ढिगाऱ्यांच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी लोकांना शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारत सरकारकडून भूकंपग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली आहे. एनडीआरएफचे अनेक पथके तुर्कीत मदतकार्यात गुंतले आहेत.
हेही वाचा : Turkey Earthquake Update : तुर्की आणि सीरिया भूकंपातील मृतांची संख्या 41,000 पार, मदतकार्य अजूनही जारी