नवी दिल्ली - भारताची महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी आपण समलैंगिक असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ माजली होती. आपला जोडीदार टीकेचा धनी बनेल या भीतीने २३ वर्षीय द्युतीने तिच्या जोडीदारीणीचे नाव जगासमोर आणले नाही. द्युतीने आज एका पत्रकार परिषदेत घेत सांगितले की आपल्या बहिणीच्या ब्लॅकमेलिंगला वैतागुन मी समलिंगी असल्याचे जगासमोर आणले.
द्युती म्हणाली, 'माझी बहीण मला ब्लॅकमेल आणि मारहाण करत होती. तसेच तिने आपल्याकडे 25 लाखांची मागणी केल्याचा धक्कादायक खुलासाही द्युतीने केलाय. त्याविरोधात मी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केलीय. या सर्व कारणांमुळेच मला समलिंगी असल्याचे जगजाहीर करावे लागले.'
द्युती सध्या टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करत आहे. तसेच समलैंगिक संबंध असल्याचे कबूल करणारी द्युती ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.