पालघर - आशियातील सर्वात मोठी अशी १७ वी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा रविवारी पार पडली. तब्बल ५५ हजाराहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत इथिओपियाच्या स्पर्धकांनी आपला दबदबा कायम ठेवला. ४२ किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये आंतराष्ट्रीय स्पर्धकांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये देरारा हुरीसाने २ तास ८ मिनिटे ८ सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. या ४२ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनीही सहभाग नोंदवला.
हेही वाचा - वाचा.. इंटरनेटवर सर्वाधिक 'सर्च' केलेला क्रिकेटपटू कोण?
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बांद्रा रेक्लमेशन अशी ४२.१९५ किलोमीटर मॅरेथॉन ४ तास ४१ मिनिटे २७ सेकंद वेळ नोंदवत पूर्ण केली. शिंदे यांनी मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या एकूण ७८०३ धावपटूंमधून २६५३ स्थान, पुरुष गटातील ७११३ धावपटूंमधून २४९६ स्थान तसेच ५० ते ५४ पुरुष वयोगटातील ६६४ धावपटूंमधून १९३ वे स्थान पटकावले.
![district collector of palghar dr kailas shinde completed 42 km mumbai marathon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5779103_thums.jpg)
माणसाच्या जीवनशैलीत दिवसेंदिवस बदल होत असतानाच ताणतणावही वाढत आहेत. त्याचे विपरीत परिणाम नागरिकांवर, तरुणांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहेत. बहुतांश नागरिकांमध्ये आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजगता दिसून येत नसल्याने आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपली तंदुरुस्ती ही तितकीच महत्त्वाची आहे. शारीरिक स्वास्थ्य टिकवून निरोगी जीवन जगता यावे, तरुणांनी व मुलांनी प्राधान्याने मैदानी खेळ खेळावेत, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी यानिमित्ताने सांगितले.