नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धांवर परिणाम झाला आहे. या स्पर्धांपैकी अनेक स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत तर काही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवल्या जात आहेत. यात बुद्धिबळ स्पर्धांचाही समावेश असून भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदलाही या कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे.
हेही वाचा - इटलीच्या ११ फूटबॉलपटूंना कोरोनाची लागण
बुंडेस्लिगा चेसमध्ये एससी बाडेनकडून खेळणारा पाचवेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद सोमवारी (१६ मार्च) जर्मनीहून मायदेशी परतणार होता, परंतु कोरोनाच्या वातावरणामुळे त्याला जर्मनीमध्येच राहण्यास भाग पाडले गेले. आनंद फेब्रुवारीपासून जर्मनीमध्ये आहे.
कोरोना विषाणूच्या फैलाव जगभरातील १०० हून अधिक देशात झाला असून या विषाणूमुळे जगभरात जवळपास ६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे ३३ रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे शहरांतील मॉल्स, जलतरण तलाव, व्यायाम शाळा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.