नाशिक - ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ असा पराभव करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. पहिल्यांदाच हर्षवर्धनच्या रुपाने नाशिकला महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्याचा मान मिळाला आहे.
हर्षवर्धनने नाशिकच्या भगूर येथील बलकवडे व्यायाम शाळेत तब्बल बारा वर्ष कुस्तीचे धडे गिरवले आहेत. आज त्याच्या विजयानंतर बलकवडे व्यायाम शाळेत जल्लोष करण्यात आला. हर्षवर्धनच्या विजयानंतर बलकवडे व्यायाम शाळेतील वस्ताद यांच्यासह तरुण-तरुणींशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल भास्कर यांनी...
शैलेश आणि हर्षवर्धन हे काका पवार यांच्या तालमीत शिकत असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थान आणि कच्चे दुवे माहित होते. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. पण अती बचावात्मक कुस्ती खेळल्याने पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला.
दुसऱ्या डावातही चुरस पाहायला मिळाली. दोनही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची एकही संधी देत नव्हते. तेव्हा शेवटचे दीड मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धनला एक गुण अती बचावात्मक पद्धतीने मिळाला आणि त्याने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर शैलेशला एक गुण मिळाला. तेव्हा मात्र, शेवटच्या २० सेंकदात हर्षवर्धनने निर्णायक २ गुण घेत बाजी मारली आणि मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
दरम्यान, यंदाचा नवा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली.