मुंबई - तमिळनाडूची सीए भवानी देवी ही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.
हंगेरी येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान तिने ही कामगिरी साकारली. सांघिक गटात भारताला उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाकडून पराभूत व्हावे लागले, पण भवानीने समायोजित अधिकृत मानांकन पद्धतीनुसार हे स्थान मिळवले.
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी भवानी देवीचे अभिनंदन केलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं असून यात त्यांनी, ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भवानीचे खूप अभिनंदन. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिला माझ्याकडून शुभेच्छा, असे म्हटलं आहे.
दरम्यान, भवानी ही जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानी आहे. आठ वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकावणारी भवानी रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकली नव्हती.
हेही वाचा - ४००हून अधिक पदके पटकाविणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी अश्विनी देवरे यांची ईटीव्ही भारतशी बातचीत
हेही वाचा - हिमा दास झाली पोलीस अधिकारी!