वाराणसी - यावर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आणि भारतीय संघाचा कर्णधार विशेष भृगुवंशीची शिफारस करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश बास्केटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस भूपेंद्र साही यांनी विशेषचे अभिनंदन केले.
भूपेंद्र शाही म्हणाले, ''यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी विशेष भृगुवंशीचे नाव निवडण्यात आले आहे. १५ वर्षांनंतर हा पुरस्कार पुरुष बास्केटबॉलपटूला खेळाडूला देण्यात येईल. अर्जुन पुरस्कारासाठी विशेष भृगुवंशीसोबत संघाने आंतरराष्ट्रीय खेळाडू रसप्रीत सिद्धू आणि अरविंद अण्णादुराई यांची नावेही मंत्रालयात पाठवली होती. मात्र, विशेषच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.''
भुवनेश्वरच्या विशेषने आपल्या कारकीर्दीत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात भारतीय बास्केटबॉल संघाने दक्षिण आशियाई गेम्स २०१९ मध्ये सुवर्णपदक जिंकले. ३६ वर्षीय विशेष २००६ पासून भारतीय बास्केटबॉल संघाचा सदस्य आहे.
विशेषने ४५ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये २०० हून अधिक सामने खेळले असून १० सुवर्ण पदके, २ रौप्य पदके आणि एक कांस्यपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशेषने आतापर्यंत ९ सुवर्णपदके, ३ रौप्यपदके आणि ३ कांस्यपदके जिंकली आहेत.
२०१९ मध्ये बास्केटबॉलमध्ये हा पुरस्कार प्राप्त करणारी प्रशांती सिंग पहिली महिला खेळाडू आहे. यापूर्वी विशेषचे अर्जुन पुरस्कारासाठी दोनदा नाव पाठवण्यात आले होते. तर, मागील १५ वर्षांत कोणत्याही पुरुष बास्केटबॉल खेळाडूला मंत्रालयाकडून कोणताही पुरस्कार देण्यात आला नाही. विशेष भृगवंशी सध्या ओएनजीसीमध्ये कार्यरत आहे. त्याचे वडील यूपी कॉलेजचे प्रवक्ते म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत, तर आई वीणा राणी सिंह मीरजापुरमधील आर्य कन्या पाठशाला इंटर कॉलेजच्या प्राचार्या आहेत.