नवी दिल्ली - मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला अमेरिकेतील सराव शिबिरात भाग घेण्यास अनुमती दिली आहे. बजरंग पुनियाकडून आगामी टोकियो ऑलिम्पपिकमध्ये पदकाची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, गुरुवारी मिशन ऑलिम्पिक सेलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने स्थापन केलेला हा विभाग टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीममध्ये (टीओपीएस) पात्र खेळाडूंची निवड करतो. हे शिबिर ४ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत मिशिगनमध्ये चालणार असून यासाठी १४ लाख रुपये खर्च येणार आहे.
कोरोनाच्या ब्रेकनंतर बजरंग सोनीपतच्या प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये सराव करत आहे. प्रशिक्षक एम्जेरिओस बेन्टिनीडीस आणि फिजिओ धनंजय यांच्यासह तो अमेरिकेत जाईल. त्याला मुख्य प्रशिक्षक सर्जे बेलोग्लाजोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कुस्तीपटूंबरोबर सराव करण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा - मॅराडोनाच्या मृतदेहासोबत फोटो काढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या!