भरतपूर (राजस्थान) - मामेबहिणीच्या आत्महत्येनंतर बबिता फोगाटने ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. बबिताने मामेबहिण कुस्तीपटू रितिकाच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करताना, आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही, असे म्हटलं आहे.
कुस्ती स्पर्धेत पराभव झाल्याने कुस्तीपटू रितिकाने गळफास घेत आत्महत्या केली. रितिका ही फोगाट बहिणी गीता आणि बबिता यांची मामेबहिण होती. रितिकाच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. यादरम्यान, बबिता फोगाटने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
परमेश्वर, रितिकाच्या आत्म्यास शांती देऊ. आमच्या परिवारासाठी ही वेळ खूप दु:खद आहे. आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. हार-जीत हे जीवनाचे महत्वपूर्ण पैलू आहेत. हरणारा एक दिवस नक्कीच जिंकत असतो. संघर्ष हेच यशाचा मार्ग आहे. संघर्षाला घाबरुन अशा प्रकारचे पाऊल उचलू नये, अशा आशयाचे ट्विट बबिताने केले आहे.

रितिकाने भरतपूर येथे झालेल्या सब-ज्यूनियर, ज्यूनियर महिला आणि पुरूष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिचा अंतिम सामन्यात पराभव झाला. पराभवातून आलेल्या नैराश्येतून रितिकाने गळफास घेत आत्महत्या केली.
हेही वाचा - ऑलिम्पिक क्वालिफायर ट्रायलमधून सुशील कुमारची माघार
हेही वाचा - त्याग असावा तर असा, ऑलिम्पिकसाठी भालाफेकपटूने सोडली 'ही' गोष्ट!