नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याने 1 मार्चपासून इंदूर येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटीसाठी 100% तयार असल्याचे घोषित केले आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'बॉक्सिंग डे' कसोटीत फलंदाजी करताना ग्रीनचे बोट तुटले होते. याआधी ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रीन दिल्लीत दुसरी कसोटी खेळेल, अशी अपेक्षा होती पण शेवटी त्याच्या न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.
कॅमरून ग्रीनने स्वतः दिली माहिती : कॅमरून ग्रीन याने स्वतः याबाबतीत सांगितले की, मी शेवटचा सामना खेळण्याच्या अगदी जवळ होतो, पण आता मला वाटते की, कदाचित जास्तीचा आठवडा घेतल्याने खूप फायदा झाला आहे. इंदूर कसोटी खेळण्यासाठी मी 100% तयार आहे. त्याचवेळी, आधीच खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत असलेल्या आणि त्यांची मालिका मध्येच सोडल्याने ग्रीनचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन हा टीमसाठी मोठा दिलासा आहे. डेव्हिड वॉर्नर, अॅश्टन एगर आणि जोश हेझलवूड यांनी मालिका आधीच सोडली आहे, तर कर्णधार पॅट कमिन्सदेखील कौटुंबिक मजबुरीमुळे ऑस्ट्रेलियात आहे. इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत कमिन्स खेळू शकणार नाही आणि त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
ऑस्ट्रेलियाला वेगवान गोलंदाजीचा अतिरिक्त पर्याय : त्याचबरोबर कॅमेरून ग्रीनसह ऑस्ट्रेलियाला वेगवान गोलंदाजीचा अतिरिक्त पर्यायही मिळाला आहे. अष्टपैलू कॅमेरून ग्रीनच्या नावावर 35.04 च्या सरासरीने 806 कसोटी धावा आणि 6 अर्धशतके आहेत. त्याने 29.78 च्या सरासरीने 23 विकेट्स देखील घेतल्या आहेत ज्यात एका सामन्यात पाच विकेट्सचा समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना 1 मार्चपासून सुरू होणार असून, भारत चार सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
उत्कृष्ट खेळाडू आरोग्याच्या समस्येने मालिकाबाहेर : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पुढील दोन कसोटींमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला फ्रॅक्चर झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मोहम्मद सिराजच्या चेंडूचा फटका हाताच्या कोपऱयाला जोरात बसला, तरीही तो खेळपट्टीवर खेळत होता. परंतु, या दुखापतीने तो 15 धावांची खेळी करू शकला. परत आल्यानंतर हाताचे स्कॅन केल्यानंतर हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. त्याची रिकव्हरी होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्याने, त्याला परत सिडनीला जाणे भाग पडले आहे.