रत्नागिरी - केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'खेलो इंडिया' राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो संघात रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन खो-खो पटूंची निवड झाली आहे. अपेक्षा सुतार आणि श्रध्दा लाड अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. खेलो इंडिया स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्षे असून पुणे-बालेवाडी येथे महाराष्ट्र संघाची निवड चाचणी पार पडली.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक खो-खो पटूंनी नाव मिळवले आहे. दरवर्षी होणार्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील एकतरी खेळाडू सहभागी असतो. खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळावे, यासाठी केंद्र शासनाने खेलो इंडिया ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वकांक्षी योजना आहे.
खो-खो सह १० खेळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी राज्यांचे संघ निवडून त्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात. यंदाची खेलो इंडिया स्पर्धा जानेवारी २०२० मध्ये आसामच्या गुवाहाटी येथे होणार आहे.
महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील संघाची निवड चाचणी बालेवाडी येथे झाली. त्यामध्ये रत्नागिरीच्या राष्ट्रीय खेळाडू अपेक्षा सुतार, श्रध्दा लाड यांची वर्णी लागली आहे. या खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदिप तावडे, शिर्के प्रशालेचे विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले.