नवी दिल्ली - अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) पटियाला येथील नॅशनल स्पोर्ट्स असोसिएशन (एनआयएस) आणि बंगळुरूस्थित भारतीय खेल प्राधिकरण (साई) सेंटरमध्ये व्यायामशाळेतील आणि बाहेरील प्रशिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली आहेत. भारताचा महिला आणि पुरुष हॉकी संघ बंगळुरू येथे आहे.
थुंकणे, हात मिळवणे, मिठी मारणे, गटात फिरणे आणि प्रशिक्षण करणे यावर मनाई आहे. भाला, फ्लाईव्हील इत्यादी साहित्याचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता राखावी लागेल, असे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले गेले आहे.
"सलून, ब्युटी पार्लर, शॉपिंग मॉल्सला भेट देण्यास पूर्णपणे बंदी आहे. प्रशिक्षण, वैद्यकीय आणि पुनर्वसन वगळता आपल्या वसतिगृहाची खोली कधीही सोडू नये. जर तुम्ही एटीएममध्ये जात असाल तर सॅनिटायझरची बाटली आपल्याकडे ठेवावी. आणि एटीएम मशीन वापरल्यानंतर सॅनिटायझर वापर करावा", असेही एएफआयने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात गृह मंत्रालयाने स्टेडियम व क्रीडा संकुले उघडण्यास परवानगी दिली आहे. गृह मंत्रालय व संबंधित राज्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्टेडियम व क्रीडा संकुलात क्रीडा उपक्रम सुरू करता येतील, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी सांगितले.