नवी दिल्ली - बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळल्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. मात्र, या पवित्र्याबाबत ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा सहमत नाही. बहिष्काराने काहीही साध्य होणार नाही असे त्याने म्हटले आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेला नेमबाजी क्रीडा प्रकाराला स्पर्धेत कसे परत स्थान देता येईल यादृष्टीने पावले उचलावीत असे बिंद्राने म्हटले आहे. त्याने पुढे म्हटले, 'बहिष्काराने काहीही साध्य होणार नाही. याचा दुष्परिणाम इतर खेळाडूंना होईल. त्यापेक्षा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समितीचे समर्थन प्राप्त करावे आणि भविष्यात नेमबाजीला प्रमुख खेळांच्या सूचीत स्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे.'
भारताची आघाडीची नेमबाज हिना सिद्धू हिने बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळल्यामुळे बहिष्कार टाकावा असे म्हटले होते. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष नरेंदर बात्रा यांनीही हिनाच्या मताचे समर्थन केले होते.
जूनमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याचा निर्णय घेतला होता. नेमबाजी प्रकारात सर्वाधिक पदके मिळत असल्याने या निर्णयामुळे भारताला मोठा धक्का लागला होता.