नवी दिल्ली - आज २९ ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील मानाचे पुरस्कार विविध खेळाडूंना दिले जातात. राष्ट्रपती भवनात या दिवशी समारोह आयोजित केला जातो. क्रीडा क्षेत्रातील मानाचे पुरस्कार विविध खेळाडूंना दिले जातात. यावर्षी कोरोनाचे संकट पाहता पुरस्कार वितरणाचा सोहळा पहिल्यांदाच ऑनलाइन पार पडणार आहे. या सोहळ्याला तब्बल १४ पुरस्कार विजेते अनुपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुरस्कार विजेत्या खेळाडूंना सन्मानित करणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी ७४ खेळाडू आणि प्रशिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यापैकी १४ जण गैरहजर राहतील, असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने स्पष्ट केले. खेलरत्न पुरस्कार विजेता भारताचा सलामीवीर रोहित शर्मा, अर्जुन पुरस्कार विजेता इशांत शर्मा यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) संयुक्त अरब अमिरातीत आहेत. शिवाय, कुस्तीपटू विनेश फोगाटसह अन्य तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि बॉक्सिंगपटू मनीष बत्रा पुण्याहून तर, महिला हॉकीपटू राणी रामपाल आणि पॅरा-अॅथलिट मारियप्पन थांगावेलू बंगळुरूहून या सोहळ्यात सामील होतील. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंडीगड, सोनपत, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि भोपाळ या ठिकाणी येणाऱ्या पुरस्कार विजेत्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.