टोकियो - भारतीय महिला हॉकी संघाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पराभवाची मालिका सुरूच आहे. आज ब्रिटनच्या महिला संघाने भारताचा 4-1 ने पराभव केला. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील सामन्यात ब्रिटिश महिला हॉकी संघाने दमदार प्रदर्शन केलं. ब्रिटनकडून सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला हेना मार्टिन हिने गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाला 10व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. परंतु यावर भारतीय खेळाडूंना गोल करत आला नाही. यानंतर 12 मिनिटाला मिळालेल्या पेनाल्टी कॉर्नरवर देखील गोल करण्यात भारतीय संघाला अपयश आलं.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये डायगनल क्रॉस हिने भारतीय बचावफळी भेदत गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु सविताने तिचा प्रयत्न हाणून पाडला. तेव्हा हेना मार्टिन हिने 19व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल करत ब्रिटनला 2-0ने आघाडी दिली. या दरम्यान, भारतीय संघाने पलटवार केला. सामन्याच्या 23व्या मिनिटाला शर्मिला देवीने गोल करत ब्रिटनची आघाडी कमी केली.
ब्रिटनच्या लिली ओस्लो हिने 42 व्या मिनिटाला गोल करत आघाडी 3-1 ने भक्कम केली. तेव्हा भारतीय संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु यात ते अपयशी ठरले. सामन्याच्या 57 व्या मिनिटाला ग्रेस बाल्सडन हिने गोल डागत ब्रिटनला 4-1 ने आघाडीवर नेलं. अखेरीस भारताने हा सामना 4-1 ने गमावला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात नेदरलंडने भारताचे 5-1 ने पराभव केला. होता. तर दुसऱ्या सामन्यात जर्मनीने 2-0 ने मात दिली होती. आता ब्रिटनकडून 4-1 ने पराभूत व्हावं लागलं आहे. या सलग पराभवामुळे भारतीय महिला हॉकी संघाचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन, शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
हेही वाचा - मनिका बत्राला ऑलिम्पिकमधील 'ती' चूक महागात पडणार, टेबल टेनिस संघ कारवाईच्या तयारीत