टोकियो - भारतीय पुरूष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळाला संपवला. ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला अखेरचे पदक 1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्ये मिळालं होतं. तेव्हा वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकलं होतं. आता भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं आहे. भारताकडून सिमरनजीत सिंग याने दोन तर हार्दिक सिंग, हरमनप्रीत सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनी प्रत्येकी 1-1 गोल केला. भारताने हा सामना 5-4 अशा फरकाने जिंकला.
पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीचा संघ वरचढ ठरला. त्यांच्या संघाने अटॅकिंग हॉकी खेळली. जर्मन संघाने सामन्याच्या पहिल्या मिनिटातच गोल करत आघाडी मिळवली. तिमुर ओरुज याने फिल्ड गोल केला. पहिला क्वार्टर संपण्याआधी जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावर भारतीय बचावफळीने शानदार बचाव केला. भारतीय गोलकिपर श्रीजेश याने या क्वार्टरमध्ये 2 वेळा चांगला बचाव केला.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने शानदार वापसी केली. 17व्या मिनिटाला सिमरनजीत सिंह याने गोल करत 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर जर्मनीच्या वेलेन याने एक गोल करत जर्मनीला 2-1 ने आघाडीवर नेलं. त्यानंतर पुढील मिनिटाला आणखी एक गोल जर्मनीने 3-1 ने आघाडी घेतली. तेव्हा भारतीय हार्दिक सिंगने 27व्या तर हरमनप्रीत सिंग याने 29व्या मिनिटाला गोल करत सामना 3-3 ने बरोबरीत आणला. हाफ टाइमपर्यंत सामना बरोबरीत राहिला.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये 31व्या मिनिटाला रविंद्र पाल सिंग याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 4-3 ने आघाडी मिळवून दिली. त्याच्या 4 मिनिटानंतर सिमरनजीत सिंगने आणखी एक गोल करत भारताची आघाडी 5-3 ने वाढवली. तिसरा क्वार्टर संपेपर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली. दरम्यान, चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने पुन्हा एकदा भारतावर प्रतिहल्ला करत चौथा गोल केला. त्यानंतर जर्मनीच्या संघाने गोल करण्यासाठी अनेक हल्ले केले. परंतु भारतीय संघाने जर्मनीच्या खेळाडूंचे गोल करण्याचे मनसूबे उधळून लावले आणि सामना 5-4 ने जिंकला.
भारतीय पुरूष हॉकी संघाने आतापर्यंत 8 सुवर्ण पदक जिंकली
भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकली आहेत. भारताने 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956, 1964 आणि 1980 ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. याशिवाय 1960 मध्ये भारताने रौप्य पदकं जिंकलं. तर 1968, 1972 आणि 2021 (टोकियो ऑलिंपिक 2020) मध्ये कांस्य पदक आपल्या नावे केलं आहे.
हेही वाचा - Tokyo Olympic : भारतीय महिला हॉकी संघाची 'सुवर्ण' वाट अर्जेंटिनाने रोखली
हेही वाचा - Tokyo Olympics : पैलवान रवी दहिया फायनलमध्ये; कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा