टोकियो - भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने पराभव केला. अर्जेंटिनाने हा सामना 2-1 ने जिंकत अंतिम फेरी गाठली. या पराभवासह भारतीय महिला हॉकी संघाचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अर्जेंटिनाच्या बारीओनेएव्हो हिने दोन गोल केले. तर भारताकडून एकमात्र गोल गुरजीत कौर हिने केला. भारतीय संघाला कांस्य पदक जिंकण्यासाठी एक संधी आहे.
पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने शानदार सुरूवात केली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर गुरजीत कौर हिने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सातव्या मिनिटाला अर्जेंटिना संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारतीय बचाव फळीने यावर शानदार बचाव करत अर्जेंटिना संघाला गोल करण्यापासून रोखलं. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर राहिला.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिना संघाने आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. याचा परिणाम भारतीय संघाच्या खेळावर झाल्याचे पाहायला मिळाले. अशात 18व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर बारीओनेएव्हो हिने गोल करत अर्जेंटिनाला सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पण यानंतर भारतीय महिला संघाने जोरदार खेळ केला. 27व्या मिनिटाला भारताला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. तेव्हा अर्जेंटिनाने व्हिडिओ रेफरल मागितला. यात भारताला मिळालेला कॉर्नर रद्द करण्यात आला.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाचा जोरदार खेळ -
पहिला हाफ संपला तेव्हा स्कोर 1-1 अशा बरोबरीत राहिला. भारत आणि अर्जेंटिना दोन्ही संघांनी पहिल्या 30 मिनिटात जोरदार खेळ केला. दोन्ही संघामध्ये कडवं आव्हान पाहायला मिळाले. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये तर अर्जेंटिनाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाने चांगली सुरूवात केली. 36व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर बारीओनेएव्हो हिने गोल करत अर्जेंटिनाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताला आणखी एक धक्का बसला. नेहा गोयल हिला 39व्या मिनिटाला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे तिला पुढील दोन मिनिटे बाहेर बसावं लागलं. यावेळेत भारतीय संघ 10 खेळाडूंसह खेळला.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने जोरदार सुरूवात केली. सामन्याच्या 51व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर देखील मिळाला. यावर गुरजीत कौर हिने जोरदार प्रहार देखील केला. पण अर्जेंटिनाच्या गोलकिपरने तो चेंडू अडवला. यामुळे भारताची बरोबरीची संधी हुकली. अर्जेंटिनाचे खेळाडू चौथ्या क्वार्टरमध्ये चेंडूचा ताबा आपल्याकडे राखण्यास भर देत राहिले. यामुळे भारतीय संघाला हार मानावी लागली.
हेही वाचा - Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी दहियाने रचला इतिहास, रौप्य निश्चित; आता 'सुवर्ण'साठी भिडणार
हेही वाचा - Tokyo Olympic : सुवर्ण स्वप्नभंग! कुस्तीपटू दीपक पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव