सँटियागो (चिली ) : कोरोनाच्या संकटानंतर भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत चिलीचा ५-३ असा पराभव केला. या सामन्यात झारखंडच्या डुंगडुंगने हॅट्ट्रिक नोंदवत भारताचा विजय सोपा केला.
डुंगडुंगने २९व्या, ३८ व्या आणि ५२ व्या मिनिटाला गोल केले. लारींडिकीने १४व्या आणि संगीता कुमारीने ३०व्या मिनिटाला गोल केला. चिलीकडून सिमोन अवेली १०व्या, पॉला सॅन्झ २५व्या, आणि फर्नांड एरिइटाने ४९व्या मिनिटाला गोल केले.
हेही वाचा - मैदान मै मौत डाल दिया मियाँ!...गाबात सिराज चमकला
चिली संघाने दहाव्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र, भारताने चार मिनिटांनंतर बरोबरी साधली. यजमान चिलीने २५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत आघाडी घेतली. मात्र, भारताने आपले आक्रमण वाढवत २९व्या आणि ३०व्या मिनिटाला दोन गोल केले. डुंगडुंगने ३८व्या मिनिटाला आपला दुसरा आणि भारतासाठी चौथा गोल केला.
दरम्यान, चिलीने पुन्हा पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करून बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय युवा संघाने मात्र चिलीला परत येण्याची संधी दिली नाही. डुंगडुंगने ५२व्या मिनिटाला गोलची हॅट्ट्रिक पूर्ण करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.